शेगावमध्ये उद्यापासून ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा’; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार उद्घाटन
बुलढाणा जिल्ह्यासाठी आरोग्याची पर्वणी; मोफत तपासणी, औषधोपचार आणि कार्यशाळांचे आयोजन

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
शेगाव: आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासम्मेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा-२०२६’ चे भव्य आयोजन उद्यापासून शेगाव येथे होत आहे. उद्या, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:०० वाजता विसावा मैदान (आनंद सागर रोड) येथे भारताच्या राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ना. श्री. प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा मेळावा २५ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत चालणार आहे. या मेळाव्यात नागरिकांसाठी आरोग्य तपासणीपासून ते शेतीविषयक कार्यशाळांपर्यंत अनेकविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
असे आहेत मेळाव्यातील प्रमुख उपक्रम:
मोफत आरोग्य सेवा: आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी पद्धतीने मोफत उपचार व सल्ला.
दिव्यांगांसाठी विशेष शिबिर: ADIP योजनेअंतर्गत तपासणी, साहित्य नोंदणी आणि वाटप.
शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा: २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ‘वनौषधी लागवड, प्रक्रिया आणि विपणन’ या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
आजीबाईचा बटवा: घरगुती आयुर्वेदिक प्रथमोपचाराचे विशेष प्रशिक्षण (२६ फेब्रुवारी, दुपारी १२ वा.).
नेत्र तपासणी: २८ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी.
जिल्हा आयुष अधिकाऱ्यांचे आवाहन
या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या निमित्ताने देशभरातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ शेगावमध्ये दाखल होत आहेत. जिल्हा आयुष अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिक, रुग्ण आणि आयुष वैद्यकीय व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या सोहळ्याला राज्याचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, राज्यातील लोकप्रतिनिधी आणि केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आरोग्य विभाग, बुलढाणा यांच्या वतीने सर्व पाहुण्यांचे आणि नागरिकांचे स्वागत करण्यात येत आहे.




