’दादा, आम्ही आता कोणाकडे बघायचं?’ बुलढाण्यात अश्रूंचा पूर; आमदार मनोज कायंदेंचा शोक अनावर!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: राजकारणातलं धगधगतं रसायन आणि कार्यकर्त्यांसाठी मायेची सावली असलेले दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुलढाण्यातील गर्दे सभागृहात आयोजित सर्वपक्षीय सभा रविवारी एका अत्यंत हृदयद्रावक प्रसंगाची साक्षीदार ठरली. सिंदखेडराजाचे राष्ट्रवादी आमदार मनोज कायंदे यांना श्रद्धांजली वाहताना भावना अनावर झाल्या आणि संपूर्ण सभागृह त्यांच्यासोबत हेलावून गेले.
’माझा लाडका आमदार’ आणि ती तुटलेली साथ…
श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना आमदार मनोज कायंदे यांना शब्द सुचत नव्हते. “दीड वर्षांपूर्वी वडील गेल्यावर पूर्णतः खचलो होतो, पण दादांनी खंबीर आधार दिला. आता दादाही गेले, मग आम्ही कोणाकडे बघायचं?” असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. अजितदादांच्या सहवासात उशिरा आलो, पण त्यांनी नेहमी ‘माझा लाडका आमदार’ म्हणून प्रेम दिल्याची आठवण सांगताना मनोज कायंदे यांना दाटून आले. मंचावरून खाली उतरताच ते ढसाढसा रडू लागले.
राजकारणापलीकडची संवेदनशीलता
आमदार कायंदे यांची अवस्था पाहून ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे धावून आले. त्यांनी मनोज कायंदे यांना जवळ घेत मायेने थोपटले, तर जयश्रीताई शेळके यांनीही मागून भावनिक आधार दिला. एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असूनही दुःखाच्या या क्षणी सर्व हेवेदावे विरून गेले होते. हा प्रसंग पाहून सभागृहातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.
जोडणारं नेतृत्व: हर्षवर्धन सपकाळ
या प्रसंगाचा उल्लेख करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “अजितदादा हे माणसं जोडणारं नेतृत्व होतं. आज या मंचावर जे चित्र दिसलं, तो दादांनी विणलेला विश्वासाचा धागाच आहे, जो राजकीय मतभेद असूनही नेत्यांना एकमेकांच्या पाठीशी उभे करतो.”




