अजित पवारांच्या निधनामुळे आज ‘बुलढाणा जिल्हा बंद’; सर्वपक्षीय नेत्यांचे व्यापाऱ्यांना आवाहन

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आजच बुलढाणा जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे.
तातडीने व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन
विमान अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. परिस्थितीचे गांभीर्य आणि नेत्याप्रती असलेली आदरांजली म्हणून आजचा संपूर्ण दिवस जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत जिल्ह्यातील व्यापारी आणि व्यावसायिकांना आपली दुकाने व प्रतिष्ठाने तातडीने बंद ठेवण्याची विनंती केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात शोककळा आणि शुकशुकाट
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यावर शोककळा पसरली असून बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी ते बारामतीकडे निघाले होते, मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेच्या निषेधार्थ आणि दुखवटा म्हणून जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळला जात आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प
सर्वपक्षीय समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार, दवाखाने, औषधांची दुकाने आणि दूध पुरवठा यांसारख्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. उर्वरित सर्व खाजगी बाजारपेठा आणि व्यावसायिक व्यवहार आज पूर्णपणे बंद राहतील. जनतेने आणि व्यापाऱ्यांनी या बंदला सहकार्य करून शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




