मोताळ्यात धाडसी दरोडा: एसबीआयचे एटीएम फोडून ७ लाखांची रोकड लंपास!

बोरखेडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घटना; ठाणेदार सीताराम मेहेत्रे यांच्या कार्यप्रणालीवर आणि गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

​मोताळा: मोताळा तहसील कार्यालय चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडून तब्बल ७ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हे एटीएम बोरखेडी पोलीस स्टेशनपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. पोलीस ठाण्याजवळच घडलेल्या या धाडसी चोरीमुळे पोलीस प्रशासनाचा चोरट्यांवर वचक राहिला आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात असून, ठाणेदार सीताराम मेहेत्रे यांच्या कार्यप्रणालीवर आणि पोलिसांच्या रात्रकालीन गस्त व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास गजबजलेल्या तहसील कार्यालय चौकातील एटीएमला लक्ष्य केले. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने एटीएम मशीन फोडून त्यातील सुमारे ७ लाख रुपयांची रोकड पळवून नेली. आज सकाळी नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर मोताळा परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बोरखेडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी तातडीने मोताळा येथे घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपास यंत्रणांना आवश्यक ते निर्देश दिले आहेत.

​-नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण-

​मोताळा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी बोरखेडी शिवारात चक्क जिल्हा पोलीस अधीक्षकांची दिशाभूल करून ५ ते ६ जुगार अड्डे सुरू करण्यात आले होते, अशीही चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे. या सर्व प्रकारांमुळे तालुक्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारी फोफावली असून पोलीस प्रशासनाचा धाक पूर्णपणे संपल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

“पोलिसांची रात्रीची गस्त नियमित होत नसल्यामुळेच चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. पोलीस स्टेशन शेजारीच जर एटीएम सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्यांचे काय?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. या निष्काळजीपणामुळेच ठाणेदार सीताराम मेहेत्रे यांच्यावर सध्या चौफेर टीका होत आहे.

सध्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरखेडी पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, या घटनेमुळे मोताळा शहरातील सुरक्षेचा प्रश्न कमालीचा ऐरणीवर आला आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!