मेहकर तालुका हादरला! नागेशवाडीत डायरियाचा प्रकोप, घरोघरी रुग्ण; आरोग्य विभागाची अनास्था?

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

मेहकर:तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी या आदिवासीबहुल गावात दूषित पाण्यामुळे डायरियाची (अतिसार) तीव्र लागण झाली आहे. सद्यस्थितीत गावातील घराघरांमध्ये डायरियाचे रुग्ण आढळून येत असून, एकाच गावात रुग्णांची संख्या १०० च्या पार गेली आहे. गावात भीषण परिस्थिती असतानाही आरोग्य विभागाने केवळ पाण्याचे नमुने घेण्यापलीकडे काहीही केले नसून, अद्याप कोणताही वैद्यकीय कॅम्प न लावल्याने गावकऱ्यांना खाजगी डॉक्टरांचा आसरा घ्यावा लागत आहे.

​टेंभुखेड धरण परिसरातील विहिरीवरून थेट पाणी गावाजवळील विहिरीमध्ये सोडले जाते. हे पाणी कोणत्याही प्रकारे फिल्टर (शुद्ध) न करता गावकऱ्यांना पुरवले जाते. हेच दूषित पाणी पिल्यामुळे नागेशवाडीत डायरियाची साथ पसरल्याचे समोर आले आहे.

​गावात डायरियाची लागण झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेश नवले यांनी दिल्यानंतर, काल १४ मे रोजी आरोग्य विभागाचे पथक (सीएचओ डॉक्टर गवळी मॅडम, आरोग्य सेवक व सेविका) गावात पोहोचले. त्यांनी पाण्याचे नमुने घेतले आणि काही रुग्णांना औषधोपचार केला. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहता गावात तात्पुरता वैद्यकीय कॅम्प (अस्थायी कॅम्प) लावणे गरजेचे होते, जे आरोग्य विभागाने केले नाही. परिणामी, रुग्णांचे हाल होत असून गावातील प्रत्येक घरात १-२ रुग्णांना सलाईन लावलेले चित्र पाहायला मिळत आहे. खाजगी डॉक्टरच सध्या गावकऱ्यांसाठी धावून आले आहेत.

-​आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह-

​ग्रामीण भागात आशा सेविका आणि आरोग्य सेवकांची नियुक्ती केलेली असते. असे असताना नागेशवाडीत गेल्या अनेक दिवसांपासून साथ पसरूनही आरोग्य विभागाला याची पुसटशी कल्पना नसावी, ही मोठी शोकांतिका आहे. हे कर्मचारी गावात न जाता केवळ मुख्यालयी राहून ‘फेस रीडिंग’ (हजेरी) करून पगार लाटतात का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

“माहिती मिळताच आम्ही नागेशवाडी येथे जाऊन पाहणी केली आहे. रुग्णांना आवश्यक औषधोपचार दिला असून, पाण्याच्या स्रोतांची तपासणी करून पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत.”

— डॉ. गवई, समुदाय आरोग्य अधिकारी.

“आरोग्य सेवक, सेविका आणि आशा सेविकांनी जर नियमित गावात जाऊन घरोघरी भेटी दिल्या असत्या, तर ही परिस्थिती वेळीच समोर आली असती. आरोग्य विभागाने नियमित पाण्याचे नमुने घेऊन ग्रामपंचायतला दूषित पाण्याबाबत वेळेत सूचित करायला हवे होते.”

— सौ. शितल राजेश नवले, ग्रामपंचायत सदस्य.

“सध्या नागेशवाडीमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे. घरोघरी डायरियाचे रुग्ण खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत. गावात प्रत्येक घरात किमान एक ते दोन रुग्णांना सलाईन लागलेले आहे.”

— मारुती पुंजाजी डाखोरे, सामाजिक कार्यकर्ते, नागेशवाडी.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!