बुलढाणा-देऊळघाट मार्गावर काळाचा घाला; विद्यार्थ्यांच्या ‘इको’ने बुलेटला उडवले, एक ठार; बुलेट चालकासह चार विद्यार्थी गंभीर जखमी, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा-देऊळघाट मार्गावरील निवांत हॉटेलसमोर आज सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका भरधाव इको सीटर वाहनाने बुलेटला जोरदार धडक दिली. या अपघातात बुलेटवर पाठीमागे बसलेल्या एका ३८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, बुलेट चालकासह चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
बुलढाण्यातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या देऊळघाट येथील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी एक इको सीटर वाहन निघाले होते. या वाहनात ७ ते ८ विद्यार्थी बसलेले होते. सायंकाळी ६:३० च्या सुमारास देऊळघाट मार्गावर निवांत हॉटेलच्या पुढे हे वाहन आले असता, चालकाचे समोरून जाणाऱ्या बुलेटला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, धडक बसल्यानंतर इको सीटर वाहन रस्त्यावर दोनवेळा पलटी झाले. या अपघातात बुलेटवर स्वार असलेले रियाज बेग जफर बेग (वय ३८, रा. देऊळघाट) हे जखमी झाले, तर त्यांच्या मागे बसलेले मोहम्मद तौसिफ मोहम्मद युसुफ (वय ३८, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) हे यांचा उपचारादरम्यान मोहम्मद तौसिफ यांचा मृत्यू झाला. तौसिफ हे देऊळघाट येथे आपल्या मामाकडे आले होते, त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर पलटी झालेल्या इको वाहनातील महेश गणेश कानडे, रुद्र गजानन कटक, राजश्री शिवा माळोदे आणि शेजल शंकर कटक हे चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चालक नशेत असल्याची चर्चा
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघात घडवणारा इको सीटर वाहनाचा चालक दारूच्या नशेत होता. त्याच्या बेजबाबदारपणामुळेच हा भीषण अपघात घडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र राठोड यांनी तातडीने पोलीस ताफ्यासह रुग्णालयात धाव घेतली. आपल्या मुलांचा अपघात झाल्याचे समजताच पालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मद्यधुंद चालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.




