बुलढाण्याच्या इकबाल नगरात राहत्या घरी गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; इकबाल नगर परिसरातील घटना
दोन ते तीन दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: शहरातील इकबाल नगर भागात एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी साडीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रविवारी ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. प्रशांत प्रकाश अंबोरे (वय ३५), उर्फ ‘बबलू पेंटर’ असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने ही आत्महत्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांतचा मोठा भाऊ विलास अंबोरे हे काही कामासाठी बाहेरगावी गेले होते. ते जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडल्यानंतर प्रशांतने गळफास घेतल्याचे दिसून आले. या भीषण घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह खाली उतरवला असता, त्यातून दुर्गंधी सुटली होती, ज्यावरून ही घटना २-३ दिवसांपूर्वीच घडली असल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
बबलू पेंटर या नावाने परिसरात प्रसिद्ध असलेल्या प्रशांतच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्याच्या घराबाहेर युवकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. बुलढाणा शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




