रुग्णालय हायटेक, पण रस्ता ‘यमलोका’चा! बुलढाणा स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था;रस्त्यातच प्रसूती होण्याची भीती

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: जिल्ह्यातील माता-भगिनींच्या आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बुलढाणा शहरात ‘जिल्हा स्त्री रुग्णालय’ उभे राहिले. रुग्णालय तर प्रशस्त झाले, सुविधाही ‘हायटेक’ मिळाल्या, पण दुर्दैव असं की, या रुग्णालयापर्यंत पोहोचणारा रस्ता मात्र नरकयातना देणारा ठरत आहे. रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे पाहता, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलेची प्रसूती दवाखान्यात होण्याऐवजी रस्त्यातच होते की काय? अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

चार ते पाच वर्ष झाली, पण रस्ता मिळेना!

​गेल्या चार ते पाच वर्षांपासून हे रुग्णालय कार्यान्वित झाले आहे. मात्र, मुख्य रस्त्यापासून स्त्री रुग्णालयाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना मृत्यूच्या कळा सोसाव्या लागत आहेत.

खडीकरण झाले, पण डांबर हरवले!

​मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. रस्त्यावर खडीकरण करून ते अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. उघड्या पडलेल्या खडीमुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. आता यात जिल्हा प्रशासनाची दिरंगाई आहे की, कंत्राटदाराचा हलगर्जीपणा? हे कोडे अद्याप सुटलेले नाही. मात्र, या दिरंगाईचा फटका मात्र ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सोसावा लागत आहे. स्त्री रुग्णालयापासून मुख्य मार्गापर्यंतचा रस्ता तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने तयार करावा. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मांगणी महिला रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे..

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!