माणुसकीला काळिमा! बुलढाण्यात ५ वर्षांच्या चिमुकलीवर परप्रांतीय मजुराचा अत्याचार
वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम स्थळावरील घृणास्पद कृत्य; आरोपीला मलकापूर स्थानकातून बेड्या

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम स्थळावर कार्यरत असलेल्या एका परप्रांतीय मजुराने पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी चक्रे फिरवत आरोपीला मलकापूर रेल्वे स्थानकातून अटक केली असून पीडितेची सुटका केली आहे.
हतेडी शिवारामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम ‘सॅम इंडिया’ कंपनीमार्फत सुरू आहे. २८ जानेवारी रोजी दुपारी, झारखंड राज्यातील पलामू येथील रहिवासी असलेला संतोष ब्रिजपाल भोईया (२५ वर्ष) याने परिसरातील एका पाच वर्षांच्या मुलीला एकटे पाहून तिला फूस लावून जवळच्या झोपडीत नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यामुळे चिमुकलीला भीषण रक्तस्त्राव झाला आणि ती गंभीर जखमी झाली.
पाप लपवण्यासाठी मुलीचे अपहरण
अत्याचारानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याचे पाहून आरोपी घाबरला. त्याने तिला उपचारासाठी नेण्याऐवजी तिचे अपहरण केले आणि थेट मलकापूर रेल्वे स्थानक गाठले. दुसरीकडे, मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि बुलढाणा ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांची तत्परता आणि थरारक शोधमोहीम
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस दलाने तातडीने जिल्ह्यात अलर्ट जारी केला. बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांवर शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मलकापूर रेल्वे स्थानकातून आरोपी संतोष भोईया याला ताब्यात घेतले.बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये आणि ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा रक्तस्त्राव थांबत नसल्याने तिला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. तिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत..




