लोणार सरोवर वाचवा, अन्यथा समृद्धी महामार्ग रोखू!

वाढती पाणी पातळी आणि नष्ट होणारी क्षारता; डॉ. गोपाल बच्छीरे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: जागतिक वारसा लाभलेल्या लोणार सरोवराचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे. सरोवराची झपाट्याने वाढणारी पाणी पातळी, लोप पावणारी क्षारता आणि पाण्याखाली गेलेली प्राचीन मंदिरे वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अन्यथा ‘समृद्धी महामार्ग’ जाम करू, असा इशारा शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे व स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन पंतप्रधान, युनेस्को (फ्रान्स) आणि भारतीय पुरातत्व विभागासह संबंधित खात्यांना पाठवण्यात आले आहे.

अस्तित्व धोक्यात: ‘खारे’ सरोवर झाले ‘गोडे’

लोणार सरोवराची पाणी पातळी २० ते २५ फुटांनी वाढल्यामुळे पाण्याचे मूळ स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. पाण्याचा pH स्तर ११.५ वरून ७.५ पर्यंत खाली आला आहे, तर क्षारता (TDS) ६००० वरून थेट ४०० वर आली आहे. यामुळे सरोवरातील दुर्मिळ जैवविविधता संपून तिथे आता मासे उत्पन्न झाले आहेत. “जर ही क्षारता कायमची नष्ट झाली, तर हे केवळ एक सामान्य तलाव उरेल आणि लोणारचे जागतिक महत्त्व संपून शहराची आर्थिक घडी विस्कळीत होईल,” अशी भीती डॉ. बच्छीरे यांनी व्यक्त केली.

​-मंदिरे आणि दर्गा पाण्याखाली-

पाणी पातळी वाढल्यामुळे ११ व्या शतकातील आई कमलजा माता मंदिर, १६ व्या शतकातील गैबनशहा वली दर्गा आणि इतर प्राचीन मंदिरे पूर्णपणे जलमय झाली आहेत. मंदिरांच्या गर्भगृहात पाणी शिरल्याने मूर्ती आणि वास्तूची हानी होत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

​-डॉ. बच्छीरे यांनी सुचवलेल्या उपाययोजना-

​वॉटर लिफ्टिंग: धारतीर्थ, रामगया यांसारखे सरोवरात येणारे गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत काठावरच अडवून उपसा सिंचनाद्वारे ते पाणी शहराला पुरवावे.
​सांडपाणी प्रक्रिया: शहराचे सांडपाणी सरोवरात मिसळू नये यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) कार्यान्वित करावा.
​विभागीय समन्वय: पुरातत्व विभाग (ASI), वन्यजीव विभाग आणि महसूल विभागाने एकत्र येऊन मंदिर परिसरातील पाणी उपसण्याचे नियोजन करावे.

​-१५ दिवसांचा अल्टिमेटम-

प्रशासनाने येत्या १५ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास समृद्धी महामार्ग रोखणे, धरणे आंदोलन आणि जलसमाधी यांसारखी तीव्र आंदोलने छेडली जातील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
​हे निवेदन तहसीलदार भूषण पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, प्रधान मुख्य वनरक्षक, ए.एस.आय. दिल्ली आणि युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सेंटरला (फ्रान्स) ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. यावेळी शहर प्रमुख गजानन जाधव, सुदन अंभोरे सर, विनायक मापारी, श्रीकांत मादनकर, एकबाल कुरेशी यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!