मलकापूरचा कृषी पर्यवेक्षक ४ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
मळणीयंत्राच्या अनुदानासाठी मागितली होती लाच; बुलढाणा एसीबीची सापळा कारवाई

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: मळणीयंत्राच्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केल्याच्या मोबदल्यात ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मलकापूर येथील कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ईश्वर भागवत सावकारे (वय ४१, रा. भुसावळ) असे लाचखोर लोकसेवकाचे नाव असून, ही कारवाई आज ९ फेब्रुवारी रोजी मलकापूर-बोदवड रोडवर करण्यात आली.
यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी ‘कृषी यांत्रिकीकरण उप अभियान’ योजनेअंतर्गत मळणीयंत्र खरेदी केले होते. या यंत्राचे अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून दिल्याचा मोबदला म्हणून मलकापूर येथील उप कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक ईश्वर सावकारे यांनी ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने बुलढाणा एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीने ६ फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. यावेळी सावकारे यांनी तडजोडीअंती ४,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार, आज ९ फेब्रुवारी रोजी मलकापूर ते बोदवड रोडवरील पिंपळगावदेवी फाट्याजवळ एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ४,००० रुपयांची लाच स्वीकारताना ईश्वर सावकारे यांना रंगेहात अटक करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे व पथकातील कर्मचारी लक्ष्मीकांत इंगळे, गजानन गाल्डे, रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे आणि नितीन शेटे यांनी यशस्वीपणे पार पाडली. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-एसीबीचे आवाहन-
कोणत्याही शासकीय लोकसेवकाने कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्या ०७२६२-२४२५४८ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९४०५०९१०६४ तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.




