BREAKING NEWS : JIO मॉल मधून खरेदी केलेल्या ‘जिमिनी’ तेलाच्या सीलबंद डब्यात आढळली मेलेली घूस !

लोकप्रिय मराठी न्यूज़ नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहरात आरोग्याशी खेळणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका ग्राहकाने जिओ मार्टमधून खरेदी केलेल्या ‘जिमिनी’ (Gemini) कंपनीच्या खाण्याच्या तेलाच्या १५ लिटरच्या सीलबंद डब्यात मेलेली घूस आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहरातील रहिवासी शिवराज काकडे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक ‘जिओ मार्ट’ मधून किराणा सामानासोबत १५ लिटरचा जिमिनी कंपनीच्या तेलाचा डबा खरेदी केला होता.काही दिवसानंतर डबा उघडल्यानंतर त्यातून अत्यंत उग्र आणि घाण वास येऊ लागला. नीट पाहणी केली असता, त्या तेलाच्या डब्यात मेलेली घूस तरंगताना आढळली. धक्कादायक बाब म्हणजे, या तेलाचा रंगही रक्तासारखा लाल झाला होता.
काही प्रमाणात तेल वापरल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याने ग्राहक काकडे यांनी तातडीने तो डबा घेऊन जिओ मार्ट गाठले. तेथील मॅनेजर ला जाब विचारत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. “सीलबंद डब्यात मेलेली घूस निघणे हा प्रकार अत्यंत गंभीर असून, यामुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले असते,” अशी संतप्त प्रतिक्रिया काकडे यांनी दिली.
प्रकरण अन्न व औषध विभागाकडे
या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आता अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) पोहोचले असून, संबंधित तेलाच्या बॅचची तपासणी आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी ग्राहक शिवराज काकड़े यांनी लेखी तक्रारीद्वारे केली गेली आहे.




