बुलढाण्यात सहा मुलांना कुत्र्याचा चावा; शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत,नगर परिषदेचे दुर्लक्ष

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच दिवशी सहा लहान मुलांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पालिकेच्या ढसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय?
शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे कळप फिरत असून, या झुंडींनी अचानक लहान मुलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. जखमी झालेल्या सहा मुलांमध्ये कुणाच्या डोक्याला, कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला कुत्र्यांनी गंभीर जखमा केल्या आहेत. जखमी मुलांना तातडीने उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
शहरात गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हे कुत्रे केवळ गल्लीबोळातच नव्हे, तर मुख्य रस्त्यांवरही झुंडीने फिरत आहेत. लहान मुले खेळण्यासाठी बाहेर पडली की हे कुत्रे त्यांच्यावर तुटून पडत असल्यामुळे “मुलांना बाहेर पाठवायचे कसे?” असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे.
”शहरात कुत्र्यांची दहशत इतकी वाढली आहे की, आता घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. पालिकेने याकडे गांभीर्याने पाहून तत्काळ बंदोबस्त करावा,अशी मांगणी करण्यात येत आहे.
नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असतानाही, या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदी किंवा इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना कागदावरच असल्याची टीका होत आहे. या हिंसक कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.




