बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात दुर्मीळ शस्त्रक्रिया; महिलेच्या पोटातून काढला ‘६ किलोचा ट्यूमर’

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी एका अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे एका महिलेच्या गर्भाशयातून तब्बल सहा किलो वजनाचा ‘फायब्रॉइड’चा (Fibroid) गोळा बाहेर काढला आहे. गुरुवारी, २९ जानेवारी रोजी ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाचा ‘B-ve’ हा दुर्मीळ रक्तगट आणि पूर्वी झालेली दोन सिझेरियन ऑपरेशन्स यामुळे ही शस्त्रक्रिया वैद्यकीय पथकासाठी मोठे आव्हान होते.
वर्षभराच्या वेदनांतून सुटका
संबंधित महिला रुग्ण गेल्या वर्षभरापासून असह्य पोटदुखीने त्रस्त होती. अनेक ठिकाणी उपचार घेऊनही योग्य निदान होत नव्हते. अखेर जिल्हा स्त्री रुग्णालयात तपासणी केली असता, सोनोग्राफीमध्ये पोटात मोठा मासाचा गोळा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक यशस्वी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील आणि स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. शस्त्रक्रिया पथकात डॉ. संतोष वानखेडे, डॉ. संजीवनी वानरे, डॉ. योगेश शिंदे आणि भूलतज्ञ डॉ. प्रियंका पाटील यांचा समावेश होता. या पथकाने अत्यंत कौशल्याने ६ किलोचा गोळा बाहेर काढला.
जुना विक्रम मोडला
काही महिन्यांपूर्वी डॉ. संतोष वानखेडे यांनी याच रुग्णालयात साडेचार किलोचा मासाचा गोळा काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. आता ६ किलोचा गोळा काढून त्यांनी स्वतःचाच जुना विक्रम मोडीत काढला आहे. या यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.
सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान
या शस्त्रक्रियेत परिसेविका छाया पांडे, अमित किन्हीकर, दीपाली बिबे, आम्रपाली आरख, सुनीता मंजुळ तसेच शुभम मोहटे, सूरज हिवाळे आणि सुलभा आव्हाड यांनी मोलाचे सहकार्य केले.




