एसटी बसचा ‘कहर’; बाहेर निघालेल्या पत्र्यामुळे भीषण अपघात, पत्रकार किशोर खंदारे याचे वडील गंभीर जखमी

अतिवेगासह बसची दुरवस्था अपघाताला कारणीभूत; चिखली आगाराच्या 'अनफिट' गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

चिखली: चिखली आगाराच्या एसटी बसचा लोखंडी पत्रा बाहेर निघाल्याने पाटोदा येथे आज सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले भास्कर विष्णू खंदारे (वय ६५) हे जबर जखमी झाले असून, बसच्या दुरवस्थेमुळे एका निष्पाप नागरिकाचा जीव धोक्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भास्कर खंदारे हे पत्रकार किशोर खंदारे यांचे वडील आहेत.

नेमकी घटना काय?

चिखली आगाराची पेन सावंगी – चिखली ही बस क्र. एमएच ०७ सी ९३७७ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास पाटोदा गावातून जात होती. यावेळी भिकाजी काकफळे (वय ३५) हे भास्कर खंदारे यांना दुचाकीवर घेऊन जात असताना गावातील अरुंद रस्त्यावर वळण घेताना समोरून येणाऱ्या बसने त्यांना हुलकावणी दिली. मात्र, बसच्या बाजूचा सुमारे १२ इंचाचा लोखंडी पत्रा बाहेर निघालेला असल्याने तो थेट भास्कर खंदारे यांच्या अंगाला लागला. या धक्क्याने ते दुचाकीवरून खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले. चालक भिकाजी काकफळे यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
​बस की फिरता ‘मौतचा सापळा’?
अपघातानंतर ग्रामस्थांनी बसची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. बसचा पत्रा आधीच उखडलेला होता. अरुंद रस्त्यावर बस वेगात असताना हा पत्रा एखाद्या शस्त्रासारखा बाहेर आला होता. “गावातील रस्ते लहान आहेत, त्यात बसचा वेग जास्त होता. बस आधीच खिळखिळी झालेली असताना ती रस्त्यावर कशी धावते?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

चिखली आगाराचा हलगर्जीपणा

एसटी प्रशासनाच्या देखभालीअभावी अनेक गाड्या ‘अनफिट’ असतानाही प्रवाशांच्या सेवेत लावल्या जात आहेत. पाटोदा येथील ही घटना केवळ अपघात नसून तो प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे बोलले जात आहे. जखमी भास्कर खंदारे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

दोषींवर कारवाईची मागणी

पत्रा बाहेर निघालेल्या अवस्थेत बस चालवणाऱ्या चालकावर आणि बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित यांत्रिक विभागावर कठोर कारवाई करण्याची मागणी पाटोदा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!