प्रजासत्ताक दिनी जिल्ह्याचा जयघोष; ५ लाख विद्यार्थी देशभक्तीपर गीतांवर करणार संचलन

बुलढाण्यातील २,४६७ शाळांचा सहभाग; 'राष्ट्र प्रथम' भावनेतून अनोखा उपक्रम

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रप्रेमाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, शिस्त आणि आरोग्याची जागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित सामूहिक कवायत व संचलन उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे ५ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हयातील २,४६७ शाळांमध्ये एकाच वेळी हा उपक्रम राबवला जाणार असून, संपूर्ण जिल्हा देशभक्तीपर गीतांच्या तालावर दुमदुमणार आहे.

-​२,४६७ शाळांमध्ये तयारीला वेग-

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना रुजवण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या एकूण २,४६७ शाळांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी राबवण्यात आलेल्या यशस्वी उपक्रमानंतर, आता प्रजासत्ताक दिनानिमित्त हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येत आहे.

-​पोलीस कवायत मैदानावर मुख्य सोहळा-

प्रत्येक शाळेत स्वतंत्रपणे कवायत होणार असली तरी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामूहिक तालुकास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचा मुख्य सोहळा बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी मैदानाची आकर्षक सजावट करण्यात आली असून, जिल्ह्याचे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

-​उद्देश: शिस्त आणि राष्ट्रीय ऐक्य-

केवळ कवायतच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिस्त, आरोग्य, राष्ट्रीय ऐक्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
​जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन
“विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम वाढीस लागावे आणि राष्ट्रहिताची भावना दृढ व्हावी, यासाठी हा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी गावोगावी शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक समिती, शिक्षणप्रेमी नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”असे आवाहान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे..

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!