BREAKING NEWS: बुलढाणा शहरातून भंगार दुकाने हद्दपार होणार; उद्याच्या विशेष सभेत येणार विषय..
भंगार व्यवसायाशी संबंधित नगरसेवकांची गोची; सत्ताधारी शिवसेनेतूनच विरोधाचा सूर

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहरातील भंगार व्यावसायिकांवर आता संक्रात येणार असून, शहरातील सर्व भंगार दुकाने बंद करून ती शहराबाहेर हलवण्याचा आश्चर्य चकित करणारा निर्णय नगर परिषद घेण्याच्या तयारीत आहे. उद्या, २३ जानेवारी रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या पहिल्याच विशेष सभेत हा ठराव मांडला जाणार असून, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या ठरावामुळे भंगार व्यवसायाशी संबंधित असलेल्या सत्ताधारी नगरसेवकांचीच गोची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
बुलढाणा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उद्या शुक्रवारी २३ जानेवारी रोजी ही पहिलीच विशेष सभा बोलावली आहे. या सभेच्या विषय पत्रिकेवरील पहिल्याच विषयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील भंगार दुकाने बंद करून त्यांचे शहराबाहेर हस्तांतरण करण्याबाबतचा ठराव मांडला जाणार आहे.
-नगरसेवकांमध्ये अस्वस्थता-
या ठरावामुळे नगर परिषदेतील अनेक सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेषतः जे नगरसेवक स्वतः किंवा ज्यांचे समर्थक या व्यवसायात आहेत, त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. हा निर्णय झाल्यास व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-आम्ही या निर्णयाचा विरोध करू -सत्ताधारी शिवसेना नगरसेवक निसार कुरेशी-
“उद्याच्या सभेत भंगार दुकाने बंद करण्याचा जो ठराव येणार आहे, त्याला आमचा ठाम विरोध असेल. भंगार दुकानांमुळे कोणालाही त्रास होत नाही, तसेच या व्यवसायातून फार मोठी कमाई देखील होत नाही. त्यामुळे गोरगरीब व्यावसायिकांवर अन्याय होऊ नये यासाठी आपण सभेत आवाज उठवू,” अशी प्रतिक्रिया सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक निसार कुरेशी यांनी ‘लोकप्रिय मराठी’शी बोलताना दिली.
नगराध्यक्षांच्या या पहिल्याच निर्णयावर आता सत्ताधारी पक्षातूनच विरोध होत असल्याने उद्याची विशेष सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. शहर विकासाच्या नावाखाली घेतला जाणारा हा निर्णय अमलात येतो की नगरसेवकांच्या विरोधामुळे मागे घेतला जातो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




