जिल्ह्यातील सर्व अवैध बायो-डीजल पंप उध्वस्त करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
खामगाव ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे तब्बल 18 पेक्षा जास्त अवैध बायो-डीजल पंप

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: काल 26 सप्टेंबर रोजी मलकापूर-नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नायगांव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून साजीद खान जलील खान व मुस्ताक खान जब्बार खान यांची मृत्यू झाला आहे.तर आरिफखान बशिरखान हा गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणाला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मकरंद आबा पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे.दरम्यान जिल्ह्यातील सर्व अवैध बायो-डीजल पंप उध्वस्त करण्याचे निर्देशच पोलिस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला दिले आहे.धक्कादायक म्हणजे खांमगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 18 पेक्षा जास्त अवैध बायो-डिजलचे पंप सुरू आहे.या बायो-डिजल माफियांना राजकीय पाठबळ असल्याने हा कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार सुरु आहे.
काल 26 सप्टेंबर रोजी मलकापूर-नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नायगांव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोन युवकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा लोकप्रिय मराठीने डीपीसी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उचलून धरला.याची पालकमंत्री ना.मकरंद आबा पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. माझ्या जिल्ह्यात अवैध चालणार नाही अशी जिल्हा प्रशासनाला तंबी देत जिल्ह्यात चालत असलेल्या अवैध बायो-डिजल पंप तात्काळ उध्वस्त करण्याच्या सूचना वजा निर्देश जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना दिले आहे.खांमगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 18 पेक्षा जास्त अवैध बायो-डिजलचे पंप सुरू आहे.
-वाहनधारक का घेताय बायो-डिजल-
वाहनांमध्ये हजारो लिटर डिजल लागत असतात,डिजल हे ज्वलनशील असते आणि बायो-डिजल देखील ज्वलनशील असल्याने हे बायो-डिजल,डिजलच्या किंमतीच्या 20 रुपये स्वतः भावाने बायो-डिजल माफिया वाहनधारकांना विकतात,यामुळेच वाहनधारक वाहनांमध्ये बायो-डिजल टाकत असतात.
-कोण पुरवतेय माफियांना बायो-डिजल-
बुलढाणा जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त बायो-डिजल पंप सुरू असून या बायो-डिजल माफियांना बायो-डिजल पुरवणारे देखील मोठं-मोठे माफिया आहे.गुजरात राज्यातून हद्दपार केलेले सुरतचे “तेली” यांचा भुसावळ येथे बायो-डिजल प्लांट आहे तेथून आणि गुजरात येथीलच असलेले “चिराग” हे सेलवाद येथून बुलढाणा जिल्ह्यातील बायो-डिजल माफियांना अवैधरित्या बायो-डिजल पुरवतात हे देखील प्रशासनाला माहीत नाही हे आश्चर्य आहे.




