लोणार सरोवराच्या अभ्यासाकरिता जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी वन्यजीव विभागाकडे पाठविला 50 लाखाचा प्रस्ताव..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: लोणार येथील ऐतिहासिक आणि जागतिक वारसा लाभलेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरातील पाणीपातळी अचानक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर याचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात २०२२ साली लोणार विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याची जबाबदारी अमरावती विद्यापीठाकडे देण्यात आली आहे.
या विषयावर जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आयआयटीचे तज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. डॉ. काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांची टीम नुकतीच लोणार येथे येऊन गेली असून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्राथमिक अभ्यास केला आहे.

डॉ. काकोडकर यांच्या टीमकडे १५ ते २० अत्याधुनिक प्रयोगशाळा असून त्या माध्यमातून पाणी, भूगर्भ, हवामान, जैवविविधता व रासायनिक घटकांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन टीममध्ये लोणार परिसरातील एका व्यक्तीचाही समावेश आहे, ज्यामुळे स्थानिक बाबींचा अभ्यास अधिक परिणामकारक ठरणार आहे.५० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे या संपूर्ण अभ्यासासाठी अंदाजे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव लोणार वन्यजीव विभागाकडे देण्यात आला असून शासनाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.

पाणीपातळी वाढ  नैसर्गिक प्रक्रिया प्राथमिक चर्चेनुसार लोणार सरोवरातील पाणीपातळी वाढणे ही पूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया असण्याची शक्यता असून, यामागे वाढलेला पर्जन्यमान, भूगर्भजल पुनर्भरण, पाणलोट क्षेत्रातील बदल व हवामान बदल हे कारणीभूत असू शकतात. मात्र यावर निश्चित निष्कर्ष काढण्यासाठी सखोल वैज्ञानिक अभ्यास आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक वारशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा लोणार सरोवर हे जगातील एकमेव उल्कापाताने निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर असून त्याचे संवर्धन, संरक्षण व शाश्वत विकासासाठी हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या संशोधनातून भविष्यातील धोरण, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!