जन्मोत्सवाच्या पूर्व संध्येला जिल्हा पत्रकार संघाकडून मॉं जिजाऊंना मानवंदना

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: थोडा स्वार्थ बाजूला ठेवला तर महापुरुषांचे विचार पुढे नेल्या जाऊ शकतात. जिजाऊ मॉंसाहेब, छत्रपती शिवाजी, महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी इतिहास घडविला. कठीण काळात संघर्ष करणार्या जिजाऊ होणे सोपे नाही. या महापुरुषांच्या जीवनातून आपण आज काय घ्यावे ? असा प्रश्न आज उभा राहतो. तेव्हा जिजाऊ सारखे शुद्ध नैतिक आचरण व शिवबा व संभाजीराजांसारखे निस्वार्थ जीवन जगण्याचे धडे आपण घेऊ शकतो असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रमोद टाले यांनी आज केले. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील पत्रकार भवन येथे जिजाऊ जयंतीच्या पूर्व संध्येला इतिहास अभ्यासक प्रमोद टाले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत होते. कार्यक्रमास अतिथी व सत्कार मूर्ती म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक प्रा.सुनील सपकाळ, उदय देशपांडे, मोहन पर्हाड सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित होते. तर पत्रकार राजेश डिडोळकर, सुभाष लहाने, रवींद्र गणेशे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम जिजाऊ पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना प्रमोद टाले म्हणाले, इतिहासाची साधने मुळात कमी आहेत. जिजाऊना महत्व द्यायला आजही एक वर्ग तयार नाही.तेच राजे लखुजी जाधव यांच्या बाबतही झाले. संपूर्ण निजामशाही राजे लखुजी यांच्यावर अवलंबून होती. येवढे मातब्बर सरदार ते होते. स्वतःचा किल्ला बांधण्याचे काम त्यांनी हाती घेतले. तत्कालीन परिथितीमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. काळा कोट म्हणून तो आजही प्रसिद्ध आहे. मुघल सत्तेखाली जनता भरडली जात होती. गुलामगिरी लादली गेली, प्रजा त्रस्त झाली त्यावेळी स्वराज्यचे पाहिले स्वप्न लखुजी राजे यांनी पाहिले. पुढे जिजाऊ यांनी शिवरायांच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले असे दिसते. ही कडी समजून घेतली पाहिजे. पण यावर संशोधन झाले नाही ते झाले पाहिजे असे सांगून त्यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या विकासाबाबत उदासीनतेवर भाष्य केले व जिजाऊ चरीत्राचे अनेक पैलू उलगडले. यावेळी उदय देशपांडे व मोहन पर्हाड, पत्रकार सुभाष लहाने, राजेश डिडोळकर, गणेशे सर यांनी समयोचित विचार मांडले.
संचलन राम हिंगे तर आभार गणेश निकम केळवदकर यांनी मानले.
यावेळी सुरेखा सावळे, वैशाली राजपूत, प्रतिभा भुतेकर, पत्रकार सर्वश्री गणेश निकम, नितीन शिरसाट, जितेंद्र कायस्थ, भानुदास लकडे, निनाजी भगत, प्रेमकुमार राठोड, रहेमत अली शाह, सुनिल मोरे, गणेश सोनुने, अजय राजगुरे, पवन सोनारे, शौकत शहा, विलास खंडेराव, ईसरार देशमुख, अजय काकडे, तुषार यंगड, आकाश भालेराव, आकाश गायकवाड, माजी नगरसेवक अरविंद होंडे, प्रा.ज्ञानेशवर खांडवे, लक्ष्मण ठाकरे यांच्यासह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विकासासाठी लोकसंग्रहकाकडे आकर्षित झालो ः प्रा.सुनील सपकाळ
सत्काराला उत्तर देताना सुनील सपकाळ यांनी बुलढाण्याचा होत असलेला विकास, यासाठी आ.संजय गायकवाड यांची धडपड पाहून विरोधकांना आपले करणार्या लोकसंग्रहाकाकडे आकर्षित झाल्याचे सांगितले. आ.संजय गायकवाड यांचा कट्टर विरोधक असतांना सुध्दा त्यांनी मला नगरसेवक होण्याची संधी दिली. त्यामुळे विरोधकाला आपलंस करण्याचे कसब आहे.
आपण सुगंध पसरविण्याचे काम करूया ः रणजीतसिंग राजपूत
बुलढाणा नगर पालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सुनील सपकाळ, उदय देशपांडे, मोहन पर्हाड यांचा सत्कार जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत व सहकार्यांनी केला. सुगंध पसरविण्याचे काम आपण करूया. बुलढाण्याच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. नवनिर्वाचित नगरसेवक वैचारिक भूमिकेचे असून आपण जेथे झाल तेथे सुगंध पेराल. बुलढाण्याचा सुसंस्कृतपणा टिकविण्याचे काम आपल्या हातून व्हावे अशी अपेक्षा रणजीतसिंग यांनी बोलतांना व्यक्त केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




