हिवरा आश्रम येथे अभूतपूर्व भव्य महापंगतीने विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता, 2 लाख पेक्षा जास्त भाविकांनी घेतला एकाच पंगतीत महाप्रसादाचा लाभ.

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळयाची सांगता आज शनिवारी १० जानेवारीला भव्य महापंगतीत महाप्रसादाच्या वितरणाने झाला त्यानिमित्त भाविकांना २०० क्विंटल गहूपुरी, १५० क्विंटल वांगे भाजीच्या वैदर्भिय चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.तब्बल १५ तासांच्या पाकसिद्धीनंतर तीन हजार स्वयंसेवकांसह विवेकानंद आश्रमाचे हजारो कार्यकर्त्यांच्या मदतीने हा महाप्रसाद बनविण्यात आला.विवेकानंद जन्मोत्सवासाठी राज्यभरातून भाविक-भक्त विवेकानंद आश्रमात दाखल होत असतात. भाविक भक्तांच्या मांदियाळीने हिवरा आश्रम फुलला होता. आज शनिवारी २ ते ५ वाजेदरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिस्तपद्धतीने भव्य महाप्रसाद वितरण केले गेले. या स्वामी विवेकानंद तीन दिवसीय जन्मोत्सवाची सांगता या महाप्रसादाच्या महापंगतीने करण्यात आले.२ लाख पेक्षा जास्त भाविकांना महाप्रसाद एकाच पंगतीमध्ये एकाच वेळेस वितरित केला गेला.महाप्रसाद वितरित करण्याच्या अगोदर उपस्थित जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील व माजी आ.संजय रायमूलकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व प.पु.शुकदाज महाराज यांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली.महाप्रसादाचा आस्वाद घेणाऱ्या नागरिकांची पूजा अर्चना करून गहूपुरी व वांगे भाजीचा प्रसाद १०० टैक्टरच्या साहाय्याने हजारो स्वयंसेवकांच्या मार्फत वाटण्यात आला.यावेळी गजानन महाराज शास्त्री यांनी आपल्या वाणीतून भाविकांना संबोधले,या महापंगतसाठी जिल्ह्यातून असंख्य राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती,विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे व उपाध्यक्ष अशोक थोरहाते व आश्रमाच्या वरिष्ठ मान्यवरांच्या मार्गदशनात हा महापंगतीचा अभूतपूर्व सोहळा पार पडला.




