मलकापूर तालुक्यात ऑटो चालकाचा गळा आवळून खून; परिसरात खळबळ

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
मलकापूर :बुलढाण्याचा मलकापूर तालुक्यातील शिवणी ते तळसवाडा रस्त्या परिसरात ऑटोचालक तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमोल भाऊराव भवरे (वय ३५ वर्षे) असे मृतकाचे नाव असून त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खून केल्यानंतर मृतदेह शिवणी–तळसवाडा रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मृतक अमोल भवरे हा व्यवसायाने ऑटो चालक असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात गळा आवळल्याच्या खुणा आढळून आल्याने हा खून असल्याचा संशय बळावला आहे. मात्र, नेमका खून कोणी व कोणत्या कारणातून केला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
घटनेचा तपास पोलीस करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मृतकाचे शेवटचे संपर्क, तसेच वैयक्तिक व व्यावसायिक वाद याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. या घटनेमुळे ऑटोचालक व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींचा शोध घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.




