बुलढाण्यात भाजपाला धक्का: पक्ष नेतृत्वाच्या हेकेखोर भूमिकेला कंटाळून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क 

बुलढाणा:बुलढाणा जिल्हा भाजपात मोठी खळबळ उडाली असून पक्षातील चार महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. जिल्हा पक्ष नेतृत्वाच्या सातत्याने सुरू असलेल्या हेकेखोर, मनमानी आणि कार्यकर्त्यांना डावलणाऱ्या भूमिकेमुळे आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे..पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आली असून निर्णय प्रक्रिया एका विशिष्ट गटा पुरती मर्यादित करण्यात आल्याचा आरोपही या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.राजीनामा दिल्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष उदय देशपांडे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष पद्मनाभ बाहेकर,माजी नगरसेवक अरविंद होंडे,माजी नगरसेवक वैभव इंगळे यांचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून संघटनात्मक बैठका न घेणे, कार्यकर्त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणे, तसेच वरिष्ठ कार्यकर्त्यांना सल्लामसलत न करता निर्णय लादले जात असल्याने पक्षात तीव्र असंतोष निर्माण झाला होता.राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की,”आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. मात्र जिल्हा नेतृत्वाकडून सतत अपमानास्पद वागणूक, दुर्लक्ष आणि एकतर्फी निर्णय लादले जात आहेत. त्यामुळे आत्मसन्मान राखण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.”
या घटनेमुळे जिल्हा भाजपातील गटबाजी पुन्हा उघड झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे हे चारही पदाधिकारी विविध तालुक्यांतील संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळणारे असून त्यांचा स्थानिक स्तरावर चांगला जनसंपर्क आहे.दरम्यान, या राजीनाम्यांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील भाजपाचे संघटनात्मक गणित बिघडण्याची शक्यता असून आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!