काँग्रेसचा १४० वा स्थापना दिन उत्साहात,काँग्रेस हा पक्ष नसून विचार : जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा : काँग्रेस हा केवळ पक्ष नसून एक व्यापक विचारधारा आहे. या विचारधारेतूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले असून देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधान अबाधित राखण्यासाठी आजही काँग्रेस विचारांची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले.
आज रविवार 28 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या १४० व्या स्थापनादिनानिमित्त बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील काँग्रेस मुख्यालयात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की, काँग्रेसने देशाला केवळ स्वातंत्र्यच दिले नाही तर सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेची मूल्ये रुजवली. आज देशासमोर असलेल्या आर्थिक, सामाजिक आणि लोकशाहीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेसची विचारधारा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काँग्रेस सदैव कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रदेश काँग्रेसचे महासचिव विश्वदिप पडोळ म्हणाले की,रक्ताचा एक थेंबही न सांडता जगातील सर्वात मोठी स्वातंत्र्यलढ्याची क्रांती महात्मा गांधीजींचे नेतृत्वात काँग्रेस पक्षाने घडून आणली, उद्योग, शिक्षण, कृषी क्रांती सह आधुनिक भारताची निर्मिती व अंगणवाडी पासून ते विद्यापीठापर्यंत बँकांच्या राष्ट्रीयकरणापासून ते एटीएम सेवेपर्यंत, अन्नसुरक्षा कायदा माहितीचा अधिकार मनरेगा सारखे असे अनेक ऐतिहासिक लोकोपयोगी कायदे काँग्रेस पक्षाने केले, तोच काँग्रेस पक्ष १४१ व्या वर्षात पदार्पण करत असताना आजही लोकशाही आणि संविधानिक मुल्यांचे रक्षण करत प्रभावी वाटचाल करीत आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते ऍड.बाबासाहेब भोंडे, बाळाभाऊ भोंडे, माजी जिल्हा परिषद सभापती अंकुश वाघ,प्रदेश निरीक्षक चित्रांगण खंडारे, दीपक रिंढे, सुनील तायडे, दत्ता काकास,प्रदेश काँग्रेसचे महासचिव विश्वदिप पडोळ, चिखली विधानसभा अध्यक्ष शिवराज पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक झाकीर कुरेशी, अमीन टेलर, शैलेश खेडकर, पत्रकार वसीम शेख, नदीम शेख, गौतम बेगानी, बुलढाणा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज सोनुने, भारत ठेंग यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.




