महाराजस्व समाधान शिबिराला जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांची भेट

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ राबविला जात आहे. त्याअंतर्गत नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व समाधान शिबिराला आज 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
या शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी थेट लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महसूल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देत, त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
या शिबिरात जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारे, विविध महसुली दाखले, भूमिहीनांना घरकुलासाठी जागा वाटप प्रमाणपत्र अशा विविध लाभांचे वितरण करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी महसूल प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांना गतीने सेवा मिळावी यासाठी असलेल्या समाधान शिबिराचे महत्त्व अधोरेखित केले.




