अन्यथा, शेतकऱ्यांसोबत डीपीडीसीत घुसू : उबाठा जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत यांचा इशारा

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: ढगफुटी सदृश्य पावसाने जिल्ह्यात होत्याचं नव्हतं झाल आहे. आभाळच फाटलं तर ठिगळ कुठे कुठे लावायच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. येत्या २५ तारखेला डीपीडीसी बैठकीमध्ये योगायोगाने बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री हेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. त्यामुळे ना.मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सकारात्मक पावलं न उचलल्यास डीपीडीसी मध्ये शेतकऱ्यांसोबत घुसू असा आक्रमक इशाराच जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी दिला आहे.
पाडळी , गिरडा मढ व परिसरात काल झालेल्या ढगफटीस दृश्य पावसाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन येथील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या व संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
अति पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान जिल्ह्यात झाले आहे. काल रविवारी रात्री पाडळी, गिरडा ,मढ, गुम्मी, इज्लापूर या बुलढाणा तालुक्यातील भागात ढगफुटी सारखा पाऊस पडला आहे. या नुकसानाची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी सहकऱ्यांसह पाहणी केली. शेतामध्ये पाणी तलावासारखे साचले आहे. शेतकऱ्यांना धीर देत प्रसंगी शासनाची दोन हात करून मदत मिळून देऊ अशी ग्वाही दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मलकापूर ,शेगाव, नांदुरा या तालुक्यात सुद्धा पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. याअति पावसाने जगाचा पोशिंदा अडचणीत सापडला आहे. पावसाने सरासरी कधीच ओलांडली असून जलसाठा प्रकल्प ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत. सोयाबीन , तूर ,कापूस व अन्य पिके ऐन बहरात आलेली असताना सप्टेंबरच्या मध्यापासून ढगफुटी सारखा पाऊस जिल्ह्यात पडत आहे. खरीप पिकेच नव्हे तर फळबागाचेही मोठे नुकसान झाले. नदीकाठच्या जमिनी तर सोडाच या ढगफुटीने जिल्ह्यात हजारो हेक्टर होईल शेती देखील खरडून गेली आहे. मनुष्य व पशुहानी देखील झाली आहे. बाराही महिने लहरी निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ढगफुटी सारखा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक स्वरूपात कंबरडे मोडले आहे. त्यामुळे या नुकसानीचे सर्वेक्षण यंत्रणा करेल मात्र त्याआधी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख डी.एस.लहाने, गजानन धांडे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, विधानसभा संघटक अनिल नरोटे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, शहर प्रमुख नारायण हेलगे, अनिकेत गवळी, राहुल जाधव, मोहम्मद सोफियान, रफिक शेख, सुधाकर मुंढे, किरण दराडे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.




