नवरात्रोत्सव काळात शहरातील वाहतुकीत बदल
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पर्यायी मार्ग

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा : नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून मोठी देवी संस्थान, बुलढाणा येथे दहा दिवसांचा उत्सव पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या सुनियमन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील वाहतुक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आदेश जारी केले आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता तसेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी बुलढाणा शहरातील जड वाहतूक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत त्रिशरण चौक, बुलढाणा ते तहसिल चौक, जयस्तंभ चौक बुलढाणा या रोडवरुन येणाऱ्या वाहतुकीसाठी त्रिशरण चौक -सर्क्युलर रोड -धाड नाका- जयस्तंभ चौक हा पर्यायी मार्ग आणि जयस्तंभ चौक, तहसिल चौक, बुलढाणा ते त्रिशरण चौक, बुलढाणा रोड वरुन जाणाऱ्या वाहतुकीसाठी जयस्तंभ चौक, धाड नाका सर्क्युलर रोड – त्रिशरण चौक हा पर्यायी उपलब्ध करण्यात आला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.




