खामगावात उबाठाचे आंदोलन,ओला दुष्काळ जाहीर करा,उबाठाची मागणी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
खांमगाव: ओला दुष्काळ जाहीर करावा या व इतर मागण्यांसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने आज 19 सप्टेंबर रोजी खांमगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयात समोर आंदोलन करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
खांमगाव उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे, शेतकरी अतिवृष्टीमुळे व काही भागात ढगफुटी तर काही भागात हुमणी अळी, येलो मोजॅक, करपा व लाल्या रोगामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देवून निवडणूकीत दिलेल्या आश्वासनानुसार त्वरीत कर्जमाफी देवून सातबारा कोरा करा. सोयाबीन वर आलेल्या येलो मोजक रोगामुळ सोयाबीनच्या शेंगा न भरता शेकडो हेक्टरवरील सोयाबीन सुकत आहे व कपाशीचे अतिवृष्टीमुळे पातेगळ झाले असून बोंड्या सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचे शासनाने त्वरीत पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रूपये सरसकट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतीही अट न ठेवता जमा करण्यात यावे. मागील वर्षाचा शासनाने जो पीक विमा जाहिर केला तो अजून शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही तो त्वरीत देण्यात यावा अन्यथा शिवसेना (उबाठा) वतीने लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.




