स्थळ पाहणीसाठी गेलेल्या नगर पालिका अभियंत्याला माणिक वाघ कडून मारहाण
जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे माणिक वाघ

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगर पालिका बांधकाम अभियंत्यास ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गजानन वाघ यांचे बंधू माणिक वाघ यांच्याकडून मारहाण करण्यात आली आहे. माणिक वाघ हे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. जळगाव जामोद शहरातील अतिक्रमणाच्या तक्रारी संदर्भाने स्थळ पाहणी करण्यासाठी गेलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या माणिक वाघ विरोधात नगरपालिका अभियंता रवी पारस्कर यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार देखील दिली आहे. जळगाव पोलिसांनी मारहाण करणाऱ्या माणिक वाघ विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.माणिक वाघ नगर अभियंता रवी पारस्कर यांना मारहाण करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत तर अशाप्रकारे मारहाण करत असताना नगरपालिका रचना सहाय्यक विद्या अहिरे ह्या आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत असताना त्यांचा देखील मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करून त्यांना शिवीगाळ करण्यात आली आहे.




