‘आदी कर्मयोगी’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात तीन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ व समारोप

वाशिम, दि.१० सप्टेंबर (जिमाका) : आदिवासी भागांमध्ये शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आणि ‘प्रतिक्रियाशील शासन’ निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाने ‘आदी कर्मयोगी प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रम’ हे अभियान सुरू केले आहे. याच अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात दि. ८ सप्टेंबर ते दि. १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
*कार्यशाळेचा उद्देश आणि स्वरूप*
या कार्यशाळेचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या हस्ते झाला, तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे यांनी मार्गदर्शन केले. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट सेवा, समर्पण आणि संकल्प या तीन तत्त्वांवर आधारित २० लाख परिवर्तनशील नेत्यांचा समूह तयार करणे आहे.
‘आपला गाव – समृद्धीचे स्वप्न’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून गावपातळीवर विकासाची नवी दृष्टी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. या कार्यशाळेत आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, ग्रामविकास, कृषी आणि ग्रामीण पाणीपुरवठा अशा विविध विभागांतील निवडक अधिकारी व कर्मचारी तालुकास्तरीय प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले होते.
*तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि ‘संपूर्ण सरकार’ दृष्टिकोन*
या कार्यशाळेत विविध विभागांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये आदिवासी विभागाचे दुर्योधन दांडगे व एस. बी. देशमुख, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शुभम ढोके, आरोग्य विभागाचे स्वप्निल चव्हाण, महिला व बालकल्याण विभागाचे अनुप कदम आणि वन विभागाचे श्री. काळे यांचा समावेश होता. या कार्यशाळेचे संचालन आदिवासी विभागातील शिक्षक श्री.मस्के यांनी केले.
या कार्यक्रमातून ‘संपूर्ण सरकार दृष्टिकोन’ या तत्त्वावर काम करून सर्व विभागांमध्ये समन्वय साधला जाईल. यामुळे आदिवासी भागांच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
*समारोप आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘आदी कर्मयोगी’ होणे ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून आदिवासी समाजात नेतृत्व तयार करणे, गतिमान प्रशासन उभारणे आणि गावकऱ्यांच्या सहभागातून एक आदर्श विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व विभागांचा सहभाग आणि समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी ‘आदी कर्मयोगी’, ‘आदी सहयोगी’ आणि ‘आदी साथी’ या तीन स्तरांवरील व्यक्तींच्या क्षमता बांधणीमुळे गाव विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असेही नमूद केले.




