राजमाता महोत्सवा’ला बुलढाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ​होम मिनिस्टरच्या खेळासह सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनाने महोत्सवात रंगली रंगत

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: ग्रामविकास व पंचायत राज विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राजमाता महोत्सव २०२६’ ला बुलढाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुलात ५ मार्च रोजी केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महोत्सवाचा थाटात शुभारंभ झाला. महिला उद्योजकांच्या उत्पादनांच्या विक्रीपासून ते खवय्यांच्या मेजवानीपर्यंत सर्वत्र नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

हास्य आणि उत्साहाचा ‘होम मिनिस्टर’

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ५ मार्च रोजी आयोजित ‘होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाने महिलांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला. प्रा. दीपक तडाखे यांनी आपल्या विनोदी शैलीने आणि टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसविले. संस्कृती आणि खेळाचा सुरेख संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. विजेत्या महिलांना पैठणी बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सत्यपाल महाराजांच्या सप्तखंजिरीने प्रबोधनाचा जागर

दुसऱ्या दिवशी ६ मार्च रोजी सुप्रसिद्ध सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले होते. अंधश्रद्धा आणि ढोंगी बाबांविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारे सत्यपाल महाराज यांचे विचार ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मांडत त्यांनी उपस्थितांना भारावून टाकले.

उर्वरित कार्यक्रमांची मेजवानी

उमेद अभियानांतर्गत महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित हा महोत्सव ९ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन महिला उद्योजकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आज (७ मार्च): ‘आराख कुटुंब’ प्रस्तुत ‘स्वरमिलाप ऑर्केस्ट्रा’ (मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम).

उद्या (८ मार्च): ‘इंद्रा इव्हेंट’ आणि ‘व्हीआयपी डान्स स्टुडिओ’ प्रस्तुत जबरदस्त डान्स परफॉर्मन्स.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!