बुलढाण्यात नाफेडची मका खरेदी ठप्प!’ शेतकऱ्यांची लूट थांबवा; मका खरेदीचे उद्दिष्ठ वाढवा,’उबाठा’ शिवसेना आक्रमक

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: “पेरलं तर पिकत नाही आणि पिकलं तर योग्य भावात विकत नाही,” अशी दुर्दैवी अवस्था सध्या बुलढाण्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी नाफेडने दिलेले मका खरेदीचे उद्दिष्ट अत्यंत तुटपुंजे असून, ते तातडीने वाढवून सर्व खरेदी केंद्रे पूर्ववत सुरू करावीत, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे (ऊबाठा) शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, २०२५-२०२६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५२,८५५.७ हेक्टरवर मका लागवड झाली आहे. नाफेडच्या निकषानुसार अंदाजे २० लाख ६१ हजार क्विंटल मका उत्पादन अपेक्षित असताना, जिल्ह्यासाठी केवळ ६० हजार क्विंटलचेच तुटपुंजे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ५,७०० हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असतानाही, उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत केंद्रे बंद करण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मका व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कापूस आणि सोयाबीन उत्पादकांचेही हाल
मक्यासोबतच सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचीही मोठी कोंडी झाली आहे. सीसीआयची कापूस खरेदी केंद्रेही बंद होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा व्यापाऱ्यांच्या शोषणाला सामोरे जावे लागत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी ऊबाठा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.शेतकऱ्यांच्या हिताचे निवेदन देण्यासाठी ऊबाठा शिवसेनेचे जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
मका खरेदी उद्दिष्टात तातडीने वाढ करावी.
बंद असलेली सर्व नाफेड मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करावीत. नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवून सीसीआय केंद्रे कापूस खरेदी पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवावीत.




