सैलानीत हजारों नारळाच्या दहनाने होळी उत्सवास प्रारंभ; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सैलानी येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या होळी उत्सवास हजारो नारळांच्या दहनाने उत्साहात सुरुवात झाली. सैलानी बाबांच्या ११९ व्या उर्स निमित्त आयोजित या सोहळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले असून, देशभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत हे पवित्र ठिकाण न्हाऊन निघाले आहे.
सैलानी येथे होळी साजरी करण्याची पद्धत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे लाकडांऐवजी लाखो नारळांची होळी पेटवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही तितक्याच निष्ठेने जोपासली जात आहे. होळी दहनानंतर या उत्सवाची अधिकृत सुरुवात होते. हे ठिकाण सर्व धर्मांच्या भाविकांचे श्रद्धेचे केंद्र असल्याने, येथे होळीचा सण कोणत्याही भेदाभेदाशिवाय साजरा केला जातो, हे या परिसराचे मोठे वैशिष्ट्य आहे.
सैलानी बाबांच्या ११९ व्या उर्स निमित्त आयोजित हा उत्सव आता सलग आठ दिवस सुरू राहणार आहे. या काळात विविध धार्मिक विधी, प्रार्थना आणि भाविकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. उत्सवाची सांगता भव्य ‘संदल’ मिरवणुकीने होणार आहे. होळीच्या या विशेष सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून लाखो भाविक सैलानीनगरीत दाखल झाले आहेत.
सुरक्षेचे कडेकोट नियोजन
लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेता, प्रशासनाकडून सुरक्षिततेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. नारळाच्या होळीचे दहन होताच उपस्थित भाविकांनी जयघोष केला. एकीकडे होळीचा आनंद आणि दुसरीकडे उर्सचा आध्यात्मिक सोहळा अशा दुहेरी वातावरणाने सैलानीनगरी भक्तिमय झाली आहे.




