जुनाट वादातून पोफळीत तरुणाची निघृण हत्या; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
मोताळा: तालुक्यातील पोफळी शिवारात जुन्या वादाच्या कारणावरून एका ३२ वर्षीय तरुणाची लाठ्याकाठ्या आणि लोखंडी आसारीने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी २७ फेब्रुवारीच्या सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
अनिकेत ऊर्फ गणेश निवृत्ती सुरडकर (३२, रा. पोफळी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विजय आमराव सुरडकर (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मयत आणि आरोपी हे एकाच गावातील असून त्यांच्यात नेहमी किरकोळ कारणांवरून वाद व्हायचे.
आज शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोफळी शिवारातील विलास राजाराम चौधरी यांच्या शेतात आरोपींनी अनिकेतला गाठले. जुन्या भांडणाची कुरापत काढून आरोपींनी अनिकेतवर लाठ्याकाठ्या आणि लोखंडी आसारीने हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर, छातीवर, मानेवर आणि पाठीवर जबर प्रहार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. या गंभीर मारहाणीत अनिकेतचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच धाणगांव बढे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली विजय आमराव सुरडकर यांच्या फिर्यादीवरून १) ब्रम्हानंद ऊर्फ धम्मा राजाराम सुरडकर (३४) २) लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे (२२) ३) कृणाल जानराव सुरडकर (२०) ४) निलेश बाळ बोदडे ५) क्रिष्णा रमेश अंभोरे (सर्व रा. पोफळी) यांच्यावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३, १८९(२), १९०, १९१, ३५१ आणि ३५२ अन्वये गुन्हा (अप.नं. ६७/२०२६) दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




