दोन दिवसांच्या हेलिपॅडसाठी ४ कोटींचा चुराडा; ही तर शासकीय निधीची उधळपट्टी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मंत्री प्रतापराव जाधवांवर प्रहार

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: शेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय आरोग्य मेळाव्या’वरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाद्वारे आयोजित या मेळाव्यासाठी तब्बल १० ते १५ कोटी रुपयांची ‘नियोजनशून्य उधळपट्टी’ करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या मेळाव्याचा सर्वसामान्य शेतकरी किंवा नागरिकांना कोणताही फायदा झाला नसून, हा केवळ मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या फायद्याचा कार्यक्रम ठरल्याची टीका त्यांनी केली आहे.
२ दिवसांच्या हेलिपॅडवर ४ कोटी १० लाखांचा खर्च?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे काही खळबळजनक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार:
नि:शुल्क जागेवर कोट्यवधींचा खर्च: संत गजानन महाराज संस्थानने राष्ट्रपतींच्या आगमनासाठी ३ हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा विनामूल्य दिली होती. मात्र, याच जागेवर अवघ्या दोन दिवसांसाठी ४ कोटी १० लाख रुपये खर्चून तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले.
नियोजनशून्य काम: जर हेच हेलिपॅड शेगावमधील एखाद्या कायमस्वरूपी शासकीय जागेवर बनवले असते, तर शहराला कायमस्वरूपी सोय झाली असती. मात्र, आता राष्ट्रपतींचा दौरा संपताच हे हेलिपॅड उखडले जाणार असून जनतेचा पैसा पाण्यात जाणार आहे.
कंत्राटावर संशय: हे हेलिपॅड बनवण्याचे कंत्राट केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या निकटवर्तीयालाच देण्यात आल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला आहे.
शेतकरी आणि जनतेची पाठ
राष्ट्रीय स्तरावरील हा मेळावा असूनही नियोजनाअभावी तो पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सपकाळ म्हणाले. मेळाव्यासाठी ७० स्टॉल्सचे नियोजन असताना प्रत्यक्षात केवळ २० ते २५ स्टॉल्स लावले गेले. आरोग्य शिबिराकडे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी पाठ फिरवल्याने हा मेळावा म्हणजे केवळ ‘शासकीय पैशांचा चुराडा’ ठरला आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.
’महाभ्रष्ट युती’ म्हणत साधला निशाणा
हर्षवर्धन सपकाळ यांनी या आरोपांच्या पुष्ट्यर्थ खामगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेली निविदेची जाहिरातही सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला कोट्यवधींचा निधी केवळ आयुष मंत्री आणि त्यांच्या समर्थकांच्या फायद्यासाठी वापरला गेला,” असे म्हणत त्यांनी सरकारवर #महाभ्रष्टयुती या हॅशटॅगसह हल्लाबोल केला आहे.




