राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नतमस्तक; शेगावच्या ‘विठू’चे घेतले दर्शन
संत श्री गजानन महाराज समाधी स्थळाला दिली भेट; संस्थानकडून पारंपरिक पद्धतीने स्वागत

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
शेगाव: भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी आज ‘विदर्भाची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे मंदिर परिसरात भक्तीचा महापूर लोटला होता.
पारंपरिक औक्षण आणि स्वागत
राष्ट्रपतींचे आगमन होताच संत श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार, मान्यवर महिलांनी राष्ट्रपती महोदयांचे औक्षण केले. यावेळी संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील आणि हरिहर निळकंठ पाटील यांनी त्यांचे स्वागत करून संस्थानच्या कार्याची माहिती दिली.
समाधी दर्शन आणि मंदिर पाहणी
स्वागत स्वीकारल्यानंतर राष्ट्रपतींनी थेट मुख्य गाभाऱ्यात जाऊन महाराजांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली. शेगाव संस्थानच्या वतीने राबविण्यात येणारे सेवा प्रकल्प, स्वच्छता आणि शिस्तबद्ध दर्शन रांगेचे त्यांनी कौतुक केले. आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवरांनी यावेळी मंदिर परिसराच्या व्यवस्थेबाबत राष्ट्रपतींना माहिती दिली.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर निळकंठ पाटील यांच्यासह आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.




