अन्यथा,२५ फेब्रुवारीला ‘राडा’ होणार ? मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम !

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
लोणार: तालुक्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादाने आता रौद्र रूप धारण केले आहे. या वादात मराठा समाजातील महिला आणि तरुण मुलींना झालेल्या अमानुष मारहाणीमुळे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. आज, २१ फेब्रुवारी रोजी त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन प्रशासनाला थेट इशारा दिला की, “२४ फेब्रुवारीपर्यंत दोषींना अटक करा, अन्यथा २५ तारखेला चिखला काकडमध्ये मोठा राडा होईल.”
चिखला काकड गावात ३ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला होता. यावरून दोन गटांत वाद निर्माण झाला. २० फेब्रुवारी रोजी हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गट समोरासमोर आले. आरोप आहे की, पोलीस उपस्थित असतानाही संजीवनी वाघ यांच्यासह इतर महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचे पडसाद उमटताच आज मनोज जरांगे पाटील यांनी गावात धाव घेतली.
जरांगे पाटलांची रोखठोक भूमिका:
पीडित महिला आणि तरुणींची विचारपूस केल्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील कडाडले. ते म्हणाले:
“आमच्या आया-बहिणींचे कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण होते, हे लज्जास्पद आहे. जर सरकार आणि प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल, तर त्यांची गाठ माझ्याशी आहे. शिवरायांचा पुतळा ज्या जागेवर आहे, तिथेच राहिला पाहिजे, तो हलवण्याचा विचारही करू नका.”
जरांगे पाटील यांनी या प्रकरणातील सर्व दोषींवर कडक कलमे लावून त्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत बेड्या ठोकण्याची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही, तर २५ फेब्रुवारीला मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. “हा लढा आता केवळ पुतळ्याचा राहिलेला नसून मराठ्यांच्या स्वाभिमानाचा बनला आहे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
गाव पोलीस छावणीच्या विळख्यात
घटनेचे गांभीर्य ओळखून गावात सध्या पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर गावात मराठा समाज मोठ्या संख्येने जमा होऊ लागला आहे. त्यामुळे पुढील ४८ तास प्रशासनासाठी आणि गावच्या शांततेसाठी अत्यंत कसोटीचे ठरणार आहेत.




