बुलढाण्यात खळबळ: १७ वर्षीय मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला; बलात्कार करून हत्येचा संशय

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

मोताळा: बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील बोराखेळी शिवारामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

​मोताळा येथील प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागच्या गिट्टी खदान असलेल्या बोराखेळी शिवारात शनिवारी एका मुलीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. घटनेची माहिती मिळताच बोराखेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेहाची ओळख पटली

​पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत मुलीचे नाव गौरी शरद पुंड (वय १७) असे असल्याचे समोर आले आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याने आणि मृतदेह ज्या स्थितीत सापडला आहे, त्यावरून तिच्यावर बलात्कार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय नातेवाईक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

तपासासाठी फॉरेन्सिक टीम पाचारण

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या (न्यायवैद्यक शास्त्र) पथकाला पाचारण केले आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही महत्त्वाचे नमुने गोळा केले आहेत. बोराखेळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सिताराम मेहेत्रे आपल्या पथकासह तपासावर लक्ष ठेवून आहेत.

शवविच्छेदनानंतर सत्य समोर येणार

​मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि तिच्यावर अत्याचार झाले होते का, हे स्पष्ट होईल. या घटनेमुळे मोताळा तालुक्यात संतापाची लाट असून आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!