लोणारच्या चिखला काकड गावात दोन गटांत तुंबळ हाणामारी; महिलांनाही कपडे फाटेपर्यंत मारहाण, गावात तणाव

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात सार्वजनिक जागेवर विनापरवाना पुतळा बसवण्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले. शनिवारी सायंकाळी झालेल्या या वादात दोन्ही बाजूंकडून तुफान हाणामारी झाली असून, यात महिलांनाही गंभीर मारहाण करण्यात आली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, चिखला काकड गावात चार ते पाच दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने सार्वजनिक जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला होता. या पुतळ्याच्या जागेवरून गेल्या तीन-चार दिवसांपासून गावात दोन गटांत धुसफूस सुरू होती. एका गटाचे म्हणणे होते की, पुतळा दुसऱ्या योग्य ठिकाणी हलवण्यात यावा, तर दुसरा गट पुतळा आहे त्याच ठिकाणी ठेवण्यावर ठाम होता.

महिलांचीही हाणामारी, पोलिसांसमोर राडा

​हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आज सायंकाळी दोन्ही गट महिलांसह रस्त्यावर उतरले. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांच्या उपस्थितीतच दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या राड्यामध्ये महिलांनाही बेदम मारहाण झाली असून काही महिलांचे वस्त्रहरण झाल्याचाही संतापजनक प्रकार घडला आहे. जमाव अधिक हिंसक झाल्याने पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला.

गावात पोलीस छावणीचे स्वरूप

​घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा चिखला काकड गावात दाखल झाला आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी ग्रामस्थांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. गावात पुन्हा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!