नऊ वर्षांच्या चिमुकलीचा रमजानचा पहिला उपवास; देशात सामाजिक सलोखा नांदण्यासाठी केली ‘दुआ’

बुलढाण्याच्या अलिजा शेखने जपली 'गंगा-जमुना तहजीब संस्कृती'; सर्वधर्मसमभावाचा दिला संदेश

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: एकीकडे आधुनिकतेच्या काळात धार्मिक भिंती उभ्या केल्या जात असताना, बुलढाण्यातील एका नऊ वर्षांच्या चिमुकलीने मात्र आपल्या पहिल्याच उपवासातून (रोझा) संपूर्ण देशाला ‘गंगा-जमुना तहजीब संस्कृती’चा आणि सामाजिक सलोख्याचा अनोखा संदेश दिला आहे. शहरातील माऊंट सनाई इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या अलिजा शेख मोहम्मद वसीम हिने १९ फेब्रुवारी रोजी आयुष्यातील पहिला रमजानचा उपवास धरला आणि अल्लाकडे आपल्या भारत देशात सर्व जाती-पातीच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे, अशी प्रार्थना केली.


अलिजा ही बुलढाण्यातील पत्रकार वसीम शेख अनवर यांची कन्या आहे. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिने रमजानचा पहिला उपवास ठेवण्याचा संकल्प केला. सूर्योदयापूर्वी ‘सहरी’ करून तिने उपवास धरला आणि दिवसभर अल्लाची इबादत केली. उपवासाच्या काळात तिने अल्लाकडे स्वतःसाठी काहीही न मागता, “माझ्या भारत देशात सर्व लोक खुशहाल असावेत आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे,” अशी दुआ केली. तिच्या या संवेदनशील विचारांमुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

कुटुंबीयांकडून पकवानांचे स्वागत

मुलीचा पहिलाच उपवास असल्याने शेख कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर ‘इफ्तार’साठी अलिजाच्या आई-वडिलांनी तिचे आवडते विविध पकवान तयार केले होते. उपवास सोडल्यानंतर अलिजाने आपला आनंद व्यक्त केला. ती म्हणाली की, “माझ्या वयाच्या इतर मुला-मुलींनीही उपवास धरले पाहिजेत, अल्ला त्यांना नक्कीच हिम्मत देईल.”

सर्वधर्मसमभावाचा प्रत्यय

आजच्या काळात अलिजासारख्या लहान मुलीने देशाच्या एकात्मतेसाठी केलेली ही प्रार्थना खऱ्या अर्थाने ‘सर्वधर्मसमभाव’ आणि ‘गंगा-जमुना तहजीब संस्कृती’चा प्रत्यय देणारी ठरली आहे. नऊ वर्षांच्या चिमुकलीने दाखवलेली ही समज आणि सामाजिक जाणिव पाहून सामाजिक स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!