बुलढाण्यात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह
भव्य दुचाकी रॅली,पाळणा उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी अवघी 'बुलढाणा नगरी' शिवमय; जयघोषाने परिसर दणाणला

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आज बुलढाणा शहरात उत्साहाचे उधाण आले होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांनी आणि सकाळी निघालेल्या भव्य मोटार सायकल रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. सकाळपासूनच शिवप्रेमींनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
बाल शिवाजींचा पाळणा उत्सव संपन्न
स्थानिक जिजामाता क्रीडा प्रेक्षागार येथे शिवजयंतीचा मुख्य सोहळा पार पडला. यावेळी बाल शिवाजींचा पाळणा उत्सव अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यातून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यात आला. उपस्थित मान्यवर आणि शिवप्रेमींच्या गगनभेदी घोषणांनी जिजामाता प्रेक्षागार परिसर शिवमय झाला होता.
भव्य रॅलीत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता. पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. शहरातील प्रत्येक चौकात आणि मोक्याच्या ठिकाणी आकर्षक मंडप उभारून तिथे शिवरायांची प्रतिमा प्रतिष्ठापित करण्यात आली होती. रॅली दरम्यान ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
शिस्तबद्ध नियोजन आणि जयघोष
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने यंदा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. भगवे ध्वज, अंगात शिवतेज आणि मुखात महाराजांचा जयघोष अशा वातावरणात ही रॅली पार पडली. शहरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि स्वागताची व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी बुलढाणा शहर व परिसरातील हजारो शिवप्रेमी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.




