शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल खेद व्यक्त करून दिलगिरीही व्यक्त करतो- हर्षवर्धन सपकाळ

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: “सरकारी कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्याबाबत मी मांडलेल्या भूमिकेचा जाणीवपूर्वक विपर्यास करून भाजपने राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान असून त्यांची तुलना कोणाशीही होऊच शकत नाही,” असे स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या फेसबुकच्या एका पोष्टने दिले आहे. तसेच, भाजपच्या ‘गलिच्छ खोडसाळपणामुळे’ शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करत दिलगिरीही व्यक्त केली आहे.

​गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानावरून भाजपने राज्यभर रान पेटवले होते. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी आपल्या फेसबुक पोष्टने आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. “माझे ७० सेकंदांचे वक्तव्य सामाजिक ऐक्यासाठी होते. मात्र, भाजप आणि त्यांच्या पिलावळीने त्यातील एका शब्दाचा संदर्भ तोडून, मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले,” असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.

​’शिवराय अद्वितीय, तुलना शक्यच नाही’

​आपल्या भूमिकेवर ठाम राहताना सपकाळ म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. टिपू सुलतानांनी महाराजांचा आदर्श घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला, असे मी म्हटले होते. ज्या टिपू सुलतानांचा फोटो भारताच्या संविधानात आहे, त्यांच्या प्रतिमेवरून समाजात तणाव वाढू नये, हाच माझ्या बोलण्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात, पण त्यावर अभ्यासू चर्चा व्हावी, संघर्ष नको.”

शिवप्रेमींना आवाहन

​शिवजयंती दोन दिवसांवर आली असून सर्वांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे. “नाठाळाचे माथी हाणू काठी” या संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देत त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. “कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. महाराजांनी दिलेला स्वराज्याचा आणि सहिष्णुतेचा मार्ग स्वीकारून आपण ऐक्याने महाराष्ट्र घडवूया,” अशी नम्र विनंती त्यांनी शिवप्रेमींना केली आहे.

 

भाजपवर गंभीर आरोप

​”पुण्यात झालेल्या दंगलीचे प्रयत्न हे भाजपच्या नियोजनबद्ध अपप्रचाराचाच भाग होते. धार्मिक ध्रुवीकरण करून सत्ता मिळवण्याचा भाजपचा हा जुना आणि विखारी फंडा आहे,” अशी टीका करत त्यांनी भाजपच्या या विकृतीविरुद्ध लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच भाजपचा ‘ट्रेड-दिल’ आणि ‘जेफरी एपस्टीन घोटाळा’ चव्हाट्यावर आणू, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!