बुलढाण्यात दिवसाढवळ्या घरफोडीचा थरार; समता नगरात दोन घरे फोडली, लाखांचा ऐवज लंपास

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. शहरातील समता नगर परिसरात भरदुपारी दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या धाडसी चोरीमुळे चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समता नगर येथील रहिवासी निखिल विश्वास नारखेडे हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील कपाटांचे लॉक तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि मोठी रोकड लंपास केली.
इतकेच नव्हे, तर चोरट्यांनी नारखेडे यांच्या शेजारी राहणाऱ्या इंगळे यांच्या घरालाही लक्ष्य केले. घटनेच्या वेळी श्री. इंगळे आपल्या ड्युटीवर गेले होते, तर त्यांचा मुलगा क्लाससाठी घराबाहेर होता. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी हे घरही फोडले. दोन्ही घरातून चोरट्यांनी नेमका किती ऐवज चोरला याचा आकडा अद्याप स्पष्ट झाला नसला, तरी तो लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरात नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी सध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे समता नगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. चोरट्यांचा बंद घरांवर पाळत ठेवून हा प्रताप केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.




