बुलढाणा शहरात ४.४९ कोटींच्या विकासकामांचा धडाका; आमदार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहराच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी सुमारे ४ कोटी ४९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ आज आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड आणि नगराध्यक्ष सौ. पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते, नाली आणि सुशोभीकरणाच्या कामांचे भूमिपूजन यावेळी उत्साहात पार पडले.
प्रमुख विकासकामे आणि तरतूद: या विकासनिधीतून शहराचा चेहरामोहरा बदलणारी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत:
रस्ते डांबरीकरण व सिमेंट रस्ते: प्रभाग क्र. १, ७,८, १०, ११, १३ आणि १४ मध्ये कोट्यवधींच्या निधीतून रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
पेव्हर ब्लॉक व नाली बांधकाम: गणेश नगर, दुर्वांकुर नगर आणि महावितरण कार्यालय परिसरातील सुविधांसाठी विशेष तरतूद.
सार्वजनिक सुविधा: अष्टविनायक नगर येथे ४९.६३ लाख रुपये खर्चून सार्वजनिक शौचालय, परिसर विकास व सौंदर्यीकरणाचे काम केले जाईल.
जनतेसाठी दर्जेदार सुविधांचे आश्वासन
याप्रसंगी बोलताना आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केले की, शहरातील प्रत्येक प्रभागात दर्जेदार रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था आणि पथदिवे यांसारख्या सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. या कामांमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार असून शहराच्या वैभवात भर पडेल.दरम्यान या सोहळ्याला युवानेते मृत्युंजय गायकवाड, मुख्याधिकारी गणेश पांडे, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना व युवासेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




