अमरावती विभागाचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बुलढाण्यात; विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या हस्ते होणार उद्घाटन

१२ फेब्रुवारीपासून तीन दिवस रंगणार मैदानी खेळांची चुरस आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; प्रशासकीय यंत्रणा सज्ज!

बुलढाणा: अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे बिगुल वाजले असून, यंदा प्रथमच बुलढाणा जिल्हा परिषदेला या मानाच्या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. उद्या गुरुवार, १२ फेब्रुवारीपासून जांभरुण रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा भव्य शुभारंभ होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी दिली.

​गुरुवारी सकाळी १० वाजता अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किरण पाटील राहतील. प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, तसेच अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुक्रमे संगीता महापात्र (अमरावती), मंदार पक्ती (यवतमाळ), अर्पित चव्हाण (वाशिम), अनिता मेश्राम (अकोला) आणि अपर आयुक्त संतोष कवडे, क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांची उपस्थिती राहणार आहे.

असा असेल कार्यक्रमांचा आराखडा:

​विभागीय स्तरावरील या महोत्सवात क्रीडा आणि कलेचा संगम पाहायला मिळणार आहे.​मैदानी व सांघिक स्पर्धा: १२ ते १४ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत विविध क्रीडा प्रकार पार पडतील.

सांस्कृतिक महोत्सव: १२ आणि १३ फेब्रुवारी या दोन दिवशी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देणारे सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत.

बक्षीस वितरण: १४ फेब्रुवारी (शनिवार) रोजी स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. ​”बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडू आणि स्पर्धकांसाठी निवास व भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्याला प्रथमच यजमानपदाचा मान मिळाला असल्याने हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.” ​या महोत्सवामुळे पाचही जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, क्रीडा संकुल परिसर आता खेळाडूंच्या उपस्थितीने गजबजणार आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!