आईच्या निधनानंतर नेत्रदान: बाहेकर कुटुंबाचा समाजासमोर अनोखा आदर्श!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

चिखली: आईच्या निधनाचे अतीव दुःख उराशी असतानाही, ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद जपत बाहेकर कुटुंबीयांनी एक हृदयस्पर्शी आदर्श समाजासमोर ठेवला आहे. किन्होळा (ता. चिखली) येथील रहिवासी मनकर्णाबाई शेषराव बाहेकर (वय ८४) यांचे ६ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. या दुःखद प्रसंगी त्यांचे पुत्र जगदीश आणि भास्कर बाहेकर यांनी मातोश्रींचे नेत्रदान करून दोन अंधांच्या जीवनात प्रकाशाची नवी पहाट आणण्याचा महान निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, जगदीश बाहेकर यांनी आपल्या सेवाकाळात वाशिम जिल्ह्यात नेत्रदान चळवळ उभी करून राज्याच्या पटलावर कौतुकास्पद कामगिरी बजावली होती. त्यांच्याच प्रयत्नांमुळे एकेकाळी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाची ख्याती ‘दृष्टी देणारे रुग्णालय’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली होती. सेवानिवृत्त नेत्र चिकित्सा अधिकारी असलेल्या बाहेकर यांनी आपली ही जनसेवेची कामगिरी निवृत्तीनंतरही अविरत सुरू ठेवली असून, स्वतःच्या आईच्या निधनानंतरही त्यांनी हे व्रत तितक्याच निष्ठेने जपले.

मनकर्णाबाई बाहेकर यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी बाहेकर बंधूंनी नेत्रदानाचा संकल्प केला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार आणि जिल्हा अंधत्व निवारण कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी नेत्र शल्य चिकित्सक डॉ. अमोल उगले, नेत्र चिकित्सा अधिकारी राजेंद्र देवकर, प्रवीण सोलंकी आणि समुपदेशक योगेश सिरसाठ यांनी तातडीने कार्यवाही करून हे नेत्रदान स्वीकारले.

मृत्यूनंतरही मातोश्रींची दृष्टी जीवंत!

​”मृत्यूनंतरही आपल्या मातोश्रींचे डोळे या जगाकडे पाहत राहतील आणि कुणाचे तरी आयुष्य उजळेल”, या भावनेने बाहेकर कुटुंबीयांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे किन्होळा परिसरात आणि आरोग्य क्षेत्रातून मोठे कौतुक होत आहे. एका सेवाभावी अधिकाऱ्याने स्वतःच्या दुःखावर मात करून समाजाला दिलेला हा संदेश खऱ्या अर्थाने माणुसकीची ज्योत प्रज्वलित करणारा ठरला आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!