ग्रामस्थांना पाहून गटविकास अधिकाऱ्यांचे पलायन; BDO च्या खुर्चीसमोर ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन!
देऊळघाट भ्रष्टाचार प्रकरण: चौकशीत दोषी असूनही कारवाई मिळेना; संतापलेल्या गावकऱ्यांचा १० तासांपासून ठिय्या

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा पंचायत समितीमध्ये आज प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. देऊळघाट ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराप्रकरणी जाब विचारण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना पाहून गटविकास अधिकारी (BDO) अमिता अजित पवार यांनी चक्क दालनातून पळ काढला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट BDO च्या केबिनमध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले असून, गेल्या १० तासांपासून हे आंदोलन सुरूच आहे.
बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा मोठा अपहार झाल्याची तक्रार होती. ग्रामसचिव रजेवर असताना सरपंच आणि सचिवांनी संगणमताने अवैधरित्या रकमा काढून खर्च केल्याचे चौकशीत समोर आले होते. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही गटविकास अधिकारी अमिता पवार यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
ग्रामस्थांना पाहताच अधिकाऱ्यांचे ‘मैदान’ साफ!
आज सकाळी ११ वाजता ग्रामस्थ या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी पंचायत समितीमध्ये पोहोचले. मात्र, संतप्त ग्रामस्थांना पाहून BDO अमिता पवार यांनी त्यांना सामोरे जाण्याऐवजी कार्यालयातून काढता पाय घेतला. वरिष्ठ अधिकारीच अशा प्रकारे पळून गेल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट त्यांच्या रिकाम्या केबिनचा ताबा घेत तिथेच जमिनीवर ठिय्या मांडला.
’जोपर्यंत कारवाई नाही, तोपर्यंत उठणार नाही’
सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. “भ्रष्टाचारी सरपंच आणि सचिवांना वाचवण्याचा प्रयत्न BDO करत आहेत. जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही आणि अधिकारी समोर येत नाहीत, तोपर्यंत आम्ही केबिन सोडणार नाही,” अशी आक्रमक भूमिका देऊळघाटच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.
प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
एकीकडे सरकार भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा दावा करत असताना, दुसरीकडे पुराव्यासह तक्रार करून आणि चौकशीत दोष सिद्ध होऊनही अधिकारी कारवाई का करत नाहीत? असा सवाल आता उपस्थित होत आहे. BDO च्या या ‘पलायन’ नाट्यामुळे प्रशासनाची मोठी नाचक्की होत आहे.




