खळबळजनक: कोट्यवधींच्या ‘डिफेंडर’चा रुबाब, पण सरकारी तिजोरीला लावला चुना!
जिल्हाधिकारी कार्यालयातील बांधकामातच 'अवैध रेती'चा वापर; दंडाचे लाखो रुपये थकवणारे कंत्राटदार ढवळे पुन्हा चर्चेत!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: ज्या कोट्यवधी रुपयांची लक्झरी ‘डिफेंडर’ गाडीने बुलढाण्याचे राजकारण तापवले होते, त्याच गाडीचे मालक आणि शासकीय कंत्राटदार निलेश ढवळे यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच अवैध रेतीचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या गंभीर बाबीसाठी बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी ३ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावून दोन वर्षे उलटली, तरीही हा दंड भरण्याची तसदी ‘डिफेंडर’ मालकाने घेतलेली नाही. यावरून कंत्राटदाराची मुजोरी आणि तहसीलदारांची त्यांच्यावर असलेली मेहरबानी चव्हाट्यावर आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
२०२२-२३ या काळात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाच्या नवीन इमारतीचे काम खामगाव येथील निलेश ढवळे यांना मिळाले होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्यावेळी जिल्ह्यात कोणत्याही रेती घाटाचे लिलाव झालेले नव्हते. असे असतानाही, ढवळे यांनी शेकडो ब्रास रेती बेकायदेशीरपणे आणली आणि चक्क शासकीय इमारतीच्या बांधकामातच वापरली.
चोरीची रेती की परराज्याच्या नांवावर गौडबंगाल?
पत्रकारांनी हा मुद्दा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चौकशीचे आदेश दिले गेले. चौकशीअंती समोर आले की,कंत्राटदाराने परराज्यातून रेती आणल्याचा दावा केला, पण त्याची ‘झिरो रॉयल्टी’ नोंद केली नव्हती. नियमानुसार ही रेती पूर्णतः बेकायदेशीर आणि अवैध ठरवण्यात आली.
परिणामी, १ मार्च २०२४ रोजी तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी ३ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला.त्यामळे रेती वर बंदी असतांना बांधकामासाठी बेकायदेशीर आणलेली रेती ही परराज्यातून आणली गेली नाही,म्हणून ही रेती चोरून आणली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दोन वर्षांपासून वसुली शून्य; प्रशासनाचा कणा मोडला?
कोट्यवधींची लक्झरी डिफेंडर गाडी वापरणाऱ्या निलेश ढवळेंनी अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. मुळात ज्या इमारतीत जिल्हाधिकारी बसतात, तिथेच अवैध रेती वापरली जाणे हा प्रशासनाचा अपमान आहे. त्यातच दोन वर्षे दंड वसूल न करणे, हे तहसीलदारांचे कंत्राटदारासोबतचे ‘अर्थपूर्ण’ लागेबांधे तर नाहीत ना? असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे.
डिफेंडरमुळे पुन्हा ‘कलगीतुरा’!
ही तीच डिफेंडर गाडी आहे जिने राजकीय नेत्यांमध्ये जुंपली होती. आता याच गाडीच्या मालकाने सरकारी नियमांना केराची टोपली दाखवल्याने पुन्हा एकदा बुलढाण्यात चर्चांना उधाण आले आहे.
आता सवाल हा आहे की, अवैध रेती वापरणाऱ्या कंत्राटदाराकडून ठोठावलेला लाखों रुपयांचा दंड वसुली जाणार की, वसुलीच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले जाणार?




