बुलढाण्यात बिबट्याची दहशत कायम; मिर्झा नगरात रात्री ९:३० वाजताच दर्शन!

घरासमोर बिबट्या आल्याने परिसरात खळबळ; वनविभागाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा शहरातील मिर्झा नगर परिसरात बिबट्याचा वावर थांबण्याचे नाव घेत नाहीये. शनिवारी, ३१ जानेवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, नेहमी मध्यरात्री दिसणारा बिबट्या यावेळी वर्दळीच्या वेळीच समोर आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिर्झा नगर येथील रहिवासी आणि एसटी मेकॅनिक गुलाम हुसेन यांच्या घरासमोर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा थरार घडला. गुलाम हुसेन यांचा मुलगा घराबाहेर असताना त्यांना घराच्या अगदी समोर बिबट्या उभा असलेला दिसला. रात्रीची वेळ असूनही परिसरात काही प्रमाणात वर्दळ असताना बिबट्या इतक्या धीटपणे मानवी वस्तीत शिरल्याने आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जात आहे.

मिर्झा नगर बनले बिबट्याचे ‘हॉटस्पॉट’

मिर्झा नगरात बिबट्या दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा या भागात बिबट्याचे दर्शन झाले असून, त्याबाबतची वृत्ते स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. या भागात असलेल्या झाडीझुडपांचा आणि निर्जन जागांचा फायदा घेऊन बिबट्या वारंवार शहरात येत आहे. गेल्या वेळी झालेल्या दर्शनानंतर वनविभागाने केवळ गस्त घालण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ठोस उपाययोजना न झाल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे.

नागरिकांमध्ये संतापाची लाट

मिर्झा नगर परिसर हा दाट वस्तीचा भाग आहे. रात्री ९-१० वाजेपर्यंत नागरिक आणि लहान मुलांची रस्त्यांवर ये-जा सुरू असते. अशा वेळी बिबट्या थेट घरासमोर येत असल्याने एखाद्या मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. “वनविभागाने आता तरी डोळे उघडावेत आणि या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा,” अशी मागणी गुलाम हुसेन यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!