“पोलीस गणवेशाचा सन्मान राखून ७ अधिकारी सेवानिवृत्त; अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडून कर्तव्यदक्षतेचे कौतुक”

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा जिल्हा पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावून नियतवयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या ७ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा निरोप समारंभ शनिवारी (३१ जानेवारी) पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्यंत उत्साहात पार पडला. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवृत्त योद्ध्यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह यथोचित सत्कार करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, मोमेंटो आणि आठवण म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या. विशेष म्हणजे पर्यावरणाचा संदेश देत सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना झाडाचे रोपटे देऊन त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पोलीस कल्याण शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) बी. डी. पावरा, राखीव पोलीस निरीक्षक श्री. तिडके, पोउपनि विजय हुडेकर, मपोहेकॉ ज्योती राठोड, मसफौ बिना श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निरोप समारंभासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे ५० हून अधिक नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते. आपल्या लाडक्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा क्षण पाहून अनेकजण भावूक झाले होते. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करून पोलीस दल नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली.
सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार
१. संजय गंगाराम ठाकरे (पोउपनि, AHTU बुलढाणा)
२. महादेव श्रीपत धंदरे (पोउपनि, CRO खामगाव)
३. सुरेश भगवान मोरे (पोउपनि, पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण)
४. गणेश तुकाराम गाभणे (GPSI, पो.स्टे. जानेफळ)
५. अनिल रामदास निंबाळकर (GPSI, पो.स्टे. धामणगाव बढे)
६. गजानन सुखदेव निंबाळकर (सफौ, मोटार परिवहन विभाग)
७. अशोक सुभाष वावगे (सफौ, पो.स्टे. तामगाव)




